ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवांची सीरम इन्स्टिट्यूटला भेट
पुणे – “कोव्हॅक्स’ या दुसऱ्या करोना प्रतिबंधक लसीचेही 130 कोटी डोस बनवण्यात येणार आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ट्रुसस्लिझ यांना दिल्याचे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी सांगितले.
ट्रुसस्लिझ त्यांच्या शिष्टमंडळाने सीरम इन्स्टिट्यूटला सोमवारी भेट दिली. यावेळी “सीरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला, अदर पूनावाला उपस्थित होते. यावेळी दोन्ही देशांमधील आरोग्यविषयक संबंध बळकट करण्याबाबत चर्चा केली. अदर पूनावाला यांनी याविषयी ट्विटरद्वारे माहिती दिली.
ट्रुसस्लिझ या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव असून त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेतली होती.
यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर सोमवारी त्यांनी “सीरम’ला भेट दिली. अदर पूनावाला यांनी त्यांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्स लसीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. तसेच आजपर्यंत सुमारे 10 कोटी डोस बनवले असून, जगभर त्याचे वितरण करणार असल्याचे पुनावाला यांनी ट्रुसस्लिझ यांना सांगितले.
ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवांनी दिलेली भेट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यावेळी आम्ही आरोग्यक्षेत्रात “उत्पादन आणि नावीन्यता’ या विषयांवर दोन्ही देशांतील संबंध कसे वाढवायचे, याबाबत चर्चा केली.
– अदर पूनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया