शिरूर – शिरूर शहरातील पाबळ फाटा सय्यदनगर येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून व जुन्या पैशांच्या वादातून एकावर चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष सोनवणे (वय 55, रा. पाबळ फाटा, सय्यदबाबा नगर, शिरूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत कल्पना सुभाष सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार करण जालिंदर भोळे (रा. पाबळ फाटा, सय्यद बाबानगर) याच्या वर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाबळ फाटा सय्यदबाबा नगर येथे सोनवणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर लहान मुलांच्या वाद झाला. याचा राग मनात धरून व जुन्या पैशांच्या वादाचा राग मनात धरून भोळे याने सुभाष यांच्याबरोबर वाद घालून, चाकूने पोटावर बरगडीत वार केले.
गंभीर जखमी सुभाष सोनवणे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. आज (रविवारी) उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिरूर पोलीस ठाण्यात याअगोदर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु आता मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी सांगितले.