राज्य पुन्हा कुडकुडले ! उत्तरेतील शीतलहरींमुळे तापमानात घट;तापमान सरासरीपेक्षा 10 अंशांनी खाली

मुंबई : देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान पोहोचल्यामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे.

नाशिकसह निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडला 6 तर नाशिकमध्ये 9.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे घराबाहेर पडणे नाशिककरांना अवघड झाले आहे.

परभणी जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आज तापमान हे घसरून 8.7 अंशावर गेले आहे. त्यामुळे सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झालाय पुढचे काही दिवस तापमान हे घसरलेलेच राहणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागाने दिला आहे.

धुळे शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यातील तापमान सात ते आठ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचले आहे. शहरासह परिसरात पसरली धुक्याची चादर टपरीवरचा वाफाळलेला चहा आणि नागरिकांची झालेली वर्दळ असे दृश्य सध्या धुळे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात तापामान 11 अंश सेल्सीअस आहे तर महाबळेश्वर 9 अंश से. वेण्णालेक 7 अंश से., वाई 8 अंश से, कराड 13 अंश से तापमान आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.