‘कॅट फ्लू’ची साथ नाही : तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा निर्वाळा
पुणे – पाळीव मांजर अचानक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण गेल्या आठवड्यापासून लक्षणीय दिसत असून, मांजरप्रेमींनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही अनेक मांजरप्रेमींनी त्याविषयी प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
सोशल मीडियावर मांजरप्रेमी ग्रुपमध्ये मांजर प्रेमींनी त्यांच्याकडील मांजराच्या मृत्युविषयीचे अनुभव शेअर केले आहेत. त्यामध्ये कोणतीही लक्षणे आधी न जाणवता अचानक तडफडून, श्वास अडखळून, “हार्ट फेल’ होऊन ही मांजरे काही तासांतच गतप्राण होत आहेत.
एका मांजरप्रेमींनी आपला अनुभव शेअर केल्यानंतर किमान पाच जणांनी असेच अनुभव शेअर केले. वास्तविक ही मांजरे कमी वयाची होती. ही पाळीव असल्याने “कॅटफुड’वगैरे बहुतांश खाद्यपदार्थ त्यांना घरातूनच मिळत होते, त्यामुळे बाहेर जाऊन काही खाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, असे निरीक्षण नोंदवले आहे.
“कॅट फ्लू’ सारखी कोणतीही तक्रार अद्याप पशुसंवर्धन विभागाकडे आली नाही. सध्या “बर्ड फ्लू’ची साथ आहे. त्यामुळे त्यावरील उपाययोजना केल्या जात आहेत.
– डॉ. शीतलकुमार मुकणे, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग
“कॅट फ्लू’ ची लक्षणे मांजरामध्ये दिसतात. त्यामध्ये शिंकणे, नाक-डोळ्यांमधून पाणी येणे, उलटी, जुलाबही कधीतरी होतात. परंतु सध्या अशी कोणतीच साथ नाही. त्यामुळे वरील लक्षणे जर दिसत असतील तर ते तपासावे लागतील.
– डॉ. इंद्राणी बॅनर्जी, पशुवैद्यकीय अधिकारी, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट