- महाविकास आघाडीत एकमत
- मंत्रिमंडळात लवकरच होणार शिक्कामोर्तब
पिंपरी – पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन सदस्यांचाच “वॉर्ड’ होणार हे अंतिम झाले असून त्यादृष्टीने राजकीय पक्षांसह इच्छुकांनी तयारी चालविल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये द्विसदस्यीच वॉर्ड पद्धतीवर एकमत झाल्याचे समोर आले असून त्याबाबत लवकरच मंत्रीमंडळात निर्णय घेतला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गतवेळी चार सदस्यीय वॉर्ड पद्धत तसेच मोदी लाटेमुळे महापालिकेवर पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. राज्यातील गेलेल्या सत्तेचाही फटका राष्ट्रवादीला बसला होता. मोठ्या मतदारसंघ रचनेचा भाजपाला फायदा होतो, त्यामुळे एक किंवा दोन सदस्यीय वॉर्ड रचना करण्याबाबत राज्यातील नेत्यांमध्ये चर्चा होती. मात्र एक ऐवजी दोन सदस्यीय वॉर्ड रचना करण्याबाबत तीनही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे समोर आले आहे.
करोनामुळे रखडलेल्या व यावर्षी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही द्विसदस्यीय पद्धतीने होणार असल्यामुळे याबाबत महिनाभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नाशिक या चार महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून ही घोषणा होण्यापूर्वीच द्विसदस्यीय पद्धतीला राज्यमंत्रीमंडळात मान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूकही द्विसदस्यीय पद्धतीने होणार आहे. शहर पातळीवरील आजपर्यंत अनुभव पहाता राष्ट्रवादीला सर्वाधिक यश हे द्विसदस्यी आणि तीन सदस्यीय पद्धतीने मिळाले आहे. या यशाच्या पुनरावृत्तीसाठी स्थानिक नेत्यांनीही द्विसदस्यीय पद्धतीलाच अनुकूल मत नोंदविले आहे.
भाजपचा भ्रष्टाचार राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर?
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपावर सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा फायदा सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. शहर पातळीवर या पक्षाची पाच वर्षांपूर्वी घट्ट पकड होती. मात्र बहुतांश नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे या पक्षाला अपयश आले होते. भाजपाच्या हाती अत्यंत विश्वासाने शहरवासियांनी सत्ता सोपविली मात्र जनतेचा भ्रमनिरासच झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. टप्प्या-टप्प्याने नागरिकांमध्ये निर्माण होत असलेली भाजपा विरोधाची भावना आणि द्विसदस्यीय पद्धती या दोन्हीचा फायदा उठविण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याचे दिसून येत आहे.
145 पेक्षा अधिक नगरसेवक
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेत 128 नगरसेवक आहेत. 2021 च्या जनगणनेनंतर लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 24 लाखांपर्यंत 145 नगरसेवक राहणार असून त्यापुढील प्रत्येकी एक लाखास एक नगरसेवक याप्रमाणे संख्या वाढणार आहे. 27 लाख लोकसंख्या आढळल्यास 148 एवढी महापालिकेतील नगरसेवकांची संख्या असणार आहे. वाढणारे नगरसेवक कोणत्या पक्षाचे असणार त्यावरही महापालिकेतील सत्ताधारी कोण ते ठरणार आहे.