-अमित डोंगरे
भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याद्वारे मायदेशात मार्च महिन्यानंतर उतरणार आहे. मार्चपासून जगभरात करोनाचा धोका सुरु झाल्यामुळे क्रिकेट ठप्प झाले होते. त्यानंतर अमिरातीत आयपीएल स्पर्धा खेळवली गेली व त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या मालिकेत संघात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवोदीतांना संधी मिळाली होती व त्यांनीही या संधीचे सोने केले होते.
आता या मालिकेतही त्यांना संधी मिळणार असून नवोदितांना अनुभवी बनण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. मुळात ही मालिका मायदेशात होत असल्यामुळे या खेळाडूंवर म्हणावा तसा दबाव नसेल त्यामुळे नैसर्गिक खेळ करण्यासाठी त्यांना पूर्ण मोकळीक राहणार आहे. सलामीवीर म्हणून हिटमॅन रोहित शर्मा याच्यासह डावाची सुरूवात करण्याची शुभमन गिलला पुन्हा संधी मिळत असल्याने त्याला जागतिक किर्तिचा फलंदाज म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणार आहे. तो जर यशस्वी ठरला तर येत्या काळात शिखर धवन किंवा पृथ्वी शॉ यांना पुढील बराच काळ प्रतिक्षा यादीत राहावे लागणार आहे. खुद्द कर्णधार विराट कोहलीने गिलचे कौतुक केल्यामुळे त्याच्यावर कोणतेही दडपण टाकले जाणार नाही ही त्याच्यासाठी जमेची बाजू ठरेल.
गिलसह या सामन्यात महंमद सिराज याला बुमराहसह नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्याच्याकडे मोठा अनुभव नसला तरीही त्याने ब्रिस्बेनसह एकूणच ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य फलंदाजांसमोर ज्या पद्धतीने वहुशारीने गोलंदाजी केली ते पाहता इंग्लंडच्या फलंदाजांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. त्याच्याकडे स्विंग आहे बाऊन्स आहे आता त्याने बुमराहकडून यॉर्करचे ज्ञान मिळवणे महत्वाचे ठरेल.
सिराजकडे उंची असल्यामुळे त्याचे वेगात बदल करुन टाकले जाणारे बाऊन्सर्स फलंदाजांना चकित करण्यासाठी पुरेसे आहेत. केवळ खेळपट्टीचा योग्य वापर करून ऍक्रॉस द विकेट गोलंदाजी करण्याचे तंत्र त्याने झहीर खानशी संवाद साधून सुधारले तर भल्या भल्या फलंदाजांवर नामुष्कीची वेळ तो आणू शकतो.
याच नवोदितांच्या यादीत वॉशिंग्टन सुंदरचा उल्लेख प्रकर्षाने करायला पाहिजे. या गोलंदाजाकडे सुरूवातीच्या काळात फार गांभीर्याने पाहिले गेले नाही. संघात यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव असे चांगले गोलंदाज असल्याने आणखी एका फिरकी गलंदाजाला खेळवण्याची चैन भारतीय संघाला परदेशात परडवडणारी नव्हती. त्यामुळे सुंदरला केवळ देशांतर्गत स्पर्धेत तसेच आयपीएल स्पर्धेतच आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळत होती. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याला संधी मिळाली आणी त्याने त्याचे सोने केले. त्याच्याकडे चांगली फिरकी आहे, रॉंग वन आहे, स्लोअर वन आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उंची आहे.
सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जेव्हा भारतीय संघातून खेळत होते तेव्हा ते त्यांच्या उंचीचा योग्य वापर करत न घाबरता चेंडूला फ्लाईट देत फलंदाजाला आमिष दाखवून बाद करायचे. तोच धूर्तपणा सुंदर दाखवत आहे. शास्त्री कदाचीत त्याच्यात आपलेच रुप पाहात असतील.
ऑस्ट्रेलियाचा दौरा गाजवलेल्या या तिनही खेळाडूंसह गेले अनेक काळ संघात स्थान मिळवूनही कधी कौतुकाचा मानकरी न ठरलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला महेंद्रसिंग धोनीचा योग्य पर्याय म्हणून समोर येण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ इंग्लंडविरुद्धची चांगली संधी मिळाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियात संघाची अवस्था बिकट असताना ज्या जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा विजय साकार केला तशाच जबाबदार खेळीची त्याच्याकडून अपेक्षा आहे.
याच नवोदितांकडून प्रस्थापितांना धक्का लागण्याची शक्यता सर्वात जास्त असली तरीही नवोदितांना अनुभवी बनण्याची सुवर्णसंधी या मालिकेद्वारे मिळाली आहे ती त्यांनी वाया घालून नये हीच अपेक्षा आहे.