वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळाला राज्यघटनेचे अधिकार उल्लंघण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची कारवाई संसदेकडून केली जाईल असे प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे. कॅपिटॉल हिलवरील भीषण हल्ल्यानंतर ट्रम्प हे लोकशाहीला धोका ठरले आहेत, असेही पेलोसी यांनी म्हटले आहे.
टम्प यांच्या हकालपट्टीबाबत पेलोसी यांनी प्रतिनिधीगृहातील सहकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी 25 व्या घटनादुरुस्तीच्या आधारे उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पहिल्यांदा भाग पाडले जाईल. त्यानंतर 24 तासांनी सभागृहाच्यावतीने हकालपट्टीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. हकालपट्टीच्या प्रक्रियेला दोन वेळा सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरतील, असेही पेलोसी यांनी सांगितले.
राज्यघटना आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्याला वेगने हालचाली कराव्या लागतील. कारण विद्यमान अध्यक्ष हे राज्यघटना आणि लोकशाही दोन्हीला धोका आहेत. या अध्यक्षांनी आपल्या लोकशाहीवर केलेल्या हल्ल्याची भीती तीव्र झाली आहे आणि त्याविरोधात त्वरित कारवाई करण्याची तातडीने गरज आहे, असे पेलोसी यांनी प्रतिनिधीगृहाच्या सदस्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
उपाध्यक्ष पेन्स यांनी 25 व्या घटनादुरुस्तीच्या आधार घ्यावा, असा ठराव प्रतिनिधीगृहामध्ये मांडला जाणार आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नाही. त्यामुळे त्या ठरावाला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर संसदेच्या पूर्ण सभागृहासमोर पेलोसी हा ठराव मांडणार आहेत. जर हा ठराव मंजूर झाला तर उपाध्यक्ष पेन्स आणि मंत्रिमंडळाला हकालपट्टीची प्रक्रिया सुरू होण्याच्या 24 तास आगोदरच हालचाली कराव्या लागतील.
हकालपट्टीच्या हालचालींना वेग आल्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच अध्यक्षपदावरून पाय उतार होण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढायला लागला आहे. ट्रम्प यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा असे मत रिपब्लिकन पक्षाच्या दोन सिनेटरनीही व्यक्त केले आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी हकालपट्टीच्या प्रक्रियेसाठी सर्व सभागृहामध्ये एकमत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यो बायडेन यांनी मात्र आपल्या 20 तारखेच्या पदग्रहण समारंभावरच लक्ष केंद्रीत केले आहे.