पुणे – दत्तवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पिस्तूलासह जेरबंद केले. ही कारवाई दत्तवाडी येथील बाल शिवाजी चौकात करण्यात आली. गोपाळ उर्फ रोहिदार बंडु गवळे(22. अप्पर इंदिरानगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूलासह एक काडतूस असा 30 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दत्तवाडी पोलीस गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे व कुंदन शिंदे यांना गवळे हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन चौकात उभा असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलिसांचे एक पथक चोैकात रवाना झाले. त्यांनी गवळेला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे कमरेला खवलेले पिस्तूल व खिशात एक काडतूस सापडले.
त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल केला आहे. गवळे हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जाळपोळ आणी शस्त्र बाळगण्यासारखे गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पोलीस अंमलदार महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले व विष्णू सुतार यांच्या पथकाने केली.