वॉशिंग्टन – या दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निवडीला आक्षेप घेणाऱ्या पोस्ट वारंवार करायला सुरुवात केल्यामुळे त्रासलेल्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामने मोठे पाऊल उचलले आहे. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट 12 तासांसाठी स्थगित केले आहे.
फेसबुकने ट्रम्प यांचे पेज 24 तासासाठी स्थगित केले आहे, तर इंस्टाग्रामने सुद्धा अमेरिकन अध्यक्षांचे अकाऊंट 24 तासासाठी बंद केले आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीबाबत भडक वक्तव्य करणे सुरूच ठेवले तर त्यांचे अकाऊंट कायमसाठी ब्लॉक केले जाईल, असा इशारा ट्विटरने दिला आहे.
फेसबुक न्यूजरूमकडून ट्विट करण्यात आले आहे की, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या विरूद्ध आम्ही दोन व्हॉयलन्स पॉलिसी अंतर्गत ऍक्शन घेतली आहे. ट्रम्प यांचे फेसबुक पेज 24 तासाठी ब्लॉक केले आहे. म्हणजे या दरम्यान ट्रम्प काहीही पोस्ट करू शकणार नाहीत. त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा हटवण्यात आला आहे. ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरू असलेली हिंसा कमी करण्याऐवजी वाढवत आहे, असे कारण फेसबुकने दिले आहे.
ट्विटर-फेसबुकच्या नंतर इंस्टाग्रामने सुद्धा ट्रम्प यांना 24 तासासाठी ब्लॉक केले आहे. आम्ही ट्रम्प यांचे इंस्टा अकाऊंट 24 तासांसाठी लॉक करत आहोत, असे इंस्टाग्रामचे प्रमुख व्यवस्थापक मसॅरी यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी केले शांततेचे आवाहन
ट्रम्प यांनी हिंसक झालेल्या आपल्या समर्थकांना आवाहन केले की, मी अमेरिकन कॅपिटलमध्ये सर्वांना शांततेचे आवाहन करतो. हिंसा होऊ नये. लक्षात ठेवा, आपण कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पक्ष आहोत. कायदा आणि पुरूष-महिलांचा सन्मान करा. धन्यवाद!