जामखेड : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-55) या राज्यमार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग 548(ड) म्हणून नव्याने मंजुर झाला असुन (सेक्शन-2) आढळगाव ते जामखेड या 62.775 कि.मी. दुपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार पुन्हा एकदा ‘पॉवरफुल’ ठरले आहेत.
पंधरा दिवसांपुर्वीच नगर-सोलापुर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे दूर करून या महामार्गाला मंजुरी मिळवली होती आता त्या कामाची ई-निविदा निघाली आहे. पंधरा दिवसांतच दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा निघाल्याने मतदारसंघासाठीच नव्हे तर अनेक तालुक्या-जिल्ह्यांसाठी हे महामार्ग विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहेत.
या नवीन महामार्गांमुळे दळणवळणाची सुविधा वाढण्यास मदत होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कायम संपर्कात राहून यासाठी पाठपुरावा केला. राज्यमार्ग (क्र.55) चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग क्र.548 (ड)असा सामावेश झाला असुन नव्याने होणारा हा मार्ग 18 महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होणार आहे. रस्ता झाल्यापासून 10 वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला. या मार्गासाठी खा.सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू होते.