- फेरीची गुणवत्ता यादी दि. 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार
पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात झाली असून शुक्रवारी (दि.1) संकेतस्थळावर रिक्त पदांची संख्या दर्शविली आहे.
तसेच, 4 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 मध्ये आवश्यकता असल्यास बदल करून घेणे तसेच या कालावधीत नवीन दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी दि. 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची पहिली विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. यानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नव्याने अर्ज प्रक्रिया, पसंतीक्रम नोंदवणे व अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली आहे.
दि. 4 जानेवारीपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया पार पडेल. यानंतर 5 जानेवारी रोजी सायं.6 वाजता गुणवत्ता यादी व कट-ऑफ गुण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या फेरीत रिक्त जागांव्यतिरिक्त कोट्यांतर्गत प्रवेश आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश दिले जाणार आहेत.