स्टॉकहोम – युरोपमध्ये अनेक ठिकाणी करोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचे आढळून आले आहे. ब्रिटनमध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे 4 रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण नुकतेच ब्रिटनमध्ये प्रवास करून आले आहेत.
फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलॅंड्स आणि ऑस्ट्रेलियाने या विषाणूचे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली असून जपानमध्येही रुग्ण सापडले आहेत.
करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, जपानने परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे.
जपानी नागरिकांना देशात प्रवेश करण्यापूर्वी “कोविड निगेटिव्ह’ असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य करण्यात आले असून देशात प्रवेश केल्यानंतर पुन्हा कोविड चाचणीला सामोरे जायचे आहे. जपानमध्ये कोविड-19 चे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.