मुंबई – शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याचा मुद्दा शिवसेनेने मांडला होता. त्यावरून अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत.
अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या अनेकवेळा चर्चा रंगल्या आहेत. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत युपीएचे अध्यक्ष होणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच युपीएच्या मित्रपक्षांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे याविषयावर अधिक बोलण्याची गरज नाही.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी किमान विकास कार्यक्रमावरून एकत्रित येत सरकार स्थापन केले आहे. राज्यात शिवसेनेशी केलेली आघाडी मर्यादित असून शिवसेना युपीएचा घटक पक्ष नसल्याने त्यांनी सल्ले देवू नयेत, अशा शब्दांत चव्हाण यांनी सुनाविले.