नवी दिल्ली – देशातील करोना रुग्णांच्या संख्येने आज अधिकृतपणे एक कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात देशातील दहा लाख रुग्णांना करोनाची बाधा झाल्याने हा आकडा आता एक कोटीच्या घरात गेला आहे.
तथापि यातील 95 लाख 50 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सप्टेंबर महिन्यात करोना रुग्णांची संख्या 60 लाख इतकी होती. ती तीन महिन्यात एक कोटीच्या घरात गेली. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार करोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 4 हजार 599 इतकी झाली आहे.
भारतात करोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळात आढळून आला होता. तर करोनाचा पहिला बळी 10 मार्च रोजी कर्नाटकात नोंदवला गेला होता. करोनाचा कहर होण्याचा धोका संपला आहे काय, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिले नाही पण त्यांनी सांगितले की काही राज्यांमधील करोनाचा आलेख खाली आला असला तरी अन्य राज्यांमध्ये त्याची स्थिती दोलायमान आहे.