- महापालिकेचा भोंगळ कारभार
- खासगी रुग्णालयांनी पूर्वीच्या करोना मृत्यूची माहितीच दिली नाही
- नवीन 167 रुग्णांची भर 281 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार आज पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. करोनाबाधित रुग्णांचे यापूर्वीच मृत्यू झाले असताना पूर्वीच्या 36 आणि गेल्या 24 तासांतील 4 अशा एकूण 40 मृत्यूंची नोंद एकाच दिवसात करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.
खासगी रुग्णालये महापालिकेला करोना मृत्यू सारख्या गंभीर बाबींबाबतही वेळेवर माहिती देत नसल्याचे वारंवार उघड होत आहे. महापालिका प्रशासन देखील खासगी रुग्णालयांवर कोणतीच कारवाई करत नसल्याने खासगी रुग्णालयांसोबत महापालिका प्रशासनालाही मृतांचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी देखील अनेकदा महापालिकेला आकड्यांमध्ये बदल करावे लागले आहेत आणि जुन्या मृत्यूंची संख्या एकाच दिवशी एकूण मृत्यूच्या आकड्यात भर टाकावी लागली. शहरामध्ये आज नवीन 167 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर पूर्वीच्या 36 व आजच्या 4 मृतांची एकत्रित 40 मृत्यूची नोंद झाली. तसेच शहरातील एकूण रुग्णांची संख्या 93814 वर पोहचली आहे.
आजचा अहवाल
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 167 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या 36 रुग्णांची माहिती पालिका प्रशासनाला आज उपलब्ध झाली. त्यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2399 इतकी झाली आहे. त्यामध्ये शहरातील 1710 तर शहराबाहेरील 689 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी येथील 3 जणांचा तर शहराबाहेरील जुन्नर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 281 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 90179 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3571 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 692 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात 10 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 10) 10 करोनाबाधित रुग्ण आढळले. करोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले. बाणेर, येरवडा, कासारवाडी, पिंपळे सौदागर, मांडवगाव, पुरंदर, हिंजवडी, चिखलगाव (ता. भोर), इनामगाव (ता. शिरूर) येथील रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 7 महिला आणि 3 पुरुष रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. थेरगाव गावठाण, वाल्हेकरवाडी, सासवड येथील तिघे करोनामुक्त झाले. त्यांना आज घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 25 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 626 जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 155 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 647 रुग्णांना होम क्वारंटाइन केले आहे.