नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघांची पोलीस कोठडी आज पुन्हा वाढविण्यात आली. ज्ञानेश्वर शिंदे, सागर भिंगारदिवे व हृषीकेश पवार यांचा त्यात समावेश असून, त्यांची पोलीस कोठडी पुन्हा 11 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
रेखा जरे हत्याकांडात सहभागी असल्याच्या आरोपावरुन सागर भिंगारदिवे व हृषीकेश पवार यांना 3 डिसेंबरला अटक करण्यात आलेली आहे. त्यांना त्याच दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाच दिवस म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, त्याची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
त्यावेळी त्यांना आणखी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, आज त्यातील तिघाही जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज दुपारनंतर पारनेर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी अजित पाटील यांच्यावतीने आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिघाही आरोपींची पोलीस कोठडी पुन्हा येत्या 11 डिसेंबरपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले.
दरम्यान, गुन्ह्यातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे अजूनही पसार असून, त्याचा पोलीस पथके कसून शोध घेत आहेत. त्या संदर्भात पोलीस छापे घालत असल्याच्या वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. तथापि, पोलीस पथके छाप्यांबाबत अत्यंत गोपनियता पाळत आहेत.