लस साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज घेणार : चार कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
पुणे – करोना लस डिसेंबर अखेर पर्यंत येण्याचे संकेत केंद्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे, महापालिका प्रशासनाकडून या लसीच्या साठवणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. या लसींच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेले कोल्ड स्टोअरेज उभारणे आणि त्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करणे यासाठी मोठा खर्च येणार आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असलेला वेळही महापालिका प्रशासनाकडे नाही त्यामुळे शहराच्या आसपासच्या औद्योगिक वसाहती मध्ये असलेले कोल्ड स्टोरेज कंपन्याशी चर्चा सुरू करण्यात आली असून चार कंपन्यानी स्टोअरेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तसेच हा स्टोरेजचा खर्च नवीन कोल्ड स्टोअरेज उभारण्या पेक्षा कमी असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात देशभरातील करोना लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती, त्यानंतर, काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत पुढील काही आठवड्यात भारताला करोना लस मिळेल असे वक्तव्य केले होते. तर आयसीएमआरकडूनही लस डिसेंबरच्या अखेर पर्यंत येण्याचे संकेत देण्यात आले आहेत, त्यामुळे देशभरात लसीकरणासाठीची यंत्रणा उभारण्यात येत आहे, देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा तसेच पुणे शहरही आघाडीवर आहे. त्यामुळे लस आल्यानंतर सर्वात जास्त रुग्ण असलेल्या मोठया शहरांमधील वैद्यकीय कर्मचारी तसेच करोना नियंत्रणाच्या कामातील पहिल्या फळीमधील कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठीची लस साठविण्याची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.
महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोल्ड स्टोरेज यंत्रणा उभारणीची चाचपणी केली होती. मात्र, ही बाब खर्चिक असून त्याची देखभाल दुरूस्ती आणि त्यानंतर कायमस्वरूपी त्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हा खर्च न करता पालिकेने शहराच्या परिसरातील कोल्ड स्टोरेज लस साठवणुकीसाठी भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या कोल्ड स्टोरेज कंपन्यांकडून पालिकेने प्रस्ताव मागविले होते. त्यात, चार कंपन्यांनी तयारी दर्शविली असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
कंपन्यांच्या वाहनांचा होणार फायदा
यातील काही कोल्ड स्टोरेज आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीची आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दहा ते 12 कोल्ड स्टोरेजची यंत्रणा असलेले ट्रक असून त्याचाही महापालिकेस फायदा होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. या ट्रकमध्ये असलेल्या वातानुकूलित यंत्रणेत 12 तास लसीसाठी आवश्यक असलेले तापमान नियंत्रित ठेवणे शक्य आहे. त्यामुळे स्टोअरेज पासून ते लसीकरण केंद्रापर्यंत त्याची वाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.