पिंपरी – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि भारत बंदमध्ये सहभाग नोंदवित महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ, पुणे यांनी मंगळवारी (दि. 8) राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली असल्याने, पुणे व नागेश्वर या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणला किंवा आणला नाही तरीदेखील नागेश्वर उपबाजाराचे कार्यालयीन कामकाज सुुरु राहणार आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतेही पत्रक प्रसिद्धीस दिलेले नाही.
मंगळवारी (दि. 8) शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाने या बंदला पाठिंबा आणि दिल्लीतील आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील 307 बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या दिवशी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. हे आवाहन राज्य बाजार समिती संघाच्या वतीने केले आहे. दरम्यान, पुणे बाजार समिती मात्र सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासक आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे. मात्र भारत बंदमध्ये विक्रीसाठी शेतकरी शेतीमाल आणतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.