- गुजरात, मुंबईमधून आणखी सहा जणांना अटक
- दोन तासांच्या प्रशिक्षणांसाठी 35 लाख रुपये
पिंपरी – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक करत असलेल्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स प्रकरणाचे जाळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्येही असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात काही धक्कादायक तथ्य उघडकीस येत आहेत. या ड्रग्स रॅकेटच्या तारा बॉलीवूडपर्यंत देखील जाऊन पोहोचत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत वीस जणांना अटक झाली आहे व 20 कोटी 90 लाख 23 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले होते. या प्रकरणी तपासाच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रग्स बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरसह सहा जणांना गुजरात आणि मुंबईमधून अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यात प्रशिक्षण, फॅक्टरी जागा, केमिकल उपलब्ध करून देणारा, विक्री करणारा यांचा समावेश आहे.
आतापर्यंत अटक केलेले आरोपी
चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजीवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको यांच्यासह अन्य सहा जणांचा समावेश आहे. आता पोलिसांनी परशुराम भालचंद्र जोगल (वय 44, रा. ठाणे), मंदार बळीराम भोसले (वय 49, ठाणे), राम मनोहरलाल गुरबानी (वय 43, रा. वेस्ट मुंबई), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (वय 39, रा. ओशिवरा मुंबई. मूळगाव मुझ्झफरनगर उत्तरप्रदेश), मनोज एकनाथ पालांडे (वय 40, रा. गणेशनगर वरसे ता रोहा जि रायगड), अफजल हुसैन अब्बास सुणसरा (वय 52, रा. जोगेश्वरी वेस्ट मुंबई. मूळगाव बडगाम, बनासकाठा, गुजरात) यांना अटक केली आहे.
ड्रग्स प्रकरणाची पार्श्वभूमी
खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले होते. सुरुवातीच्या काळात अटक केलेल्या आरोपींनी रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीत सुमारे 132 किलो एमडी ड्रग्स बनवले होते. त्यापैकी उरलेले 20 कोटी रुपयांचे 20 किलो ड्रग्स विक्री करण्यासाठी जात असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन त्यांना अटक केली होती. रांजणगाव एमआयडीसीमध्ये बनवलेल्या 132 किलोपैकी 112 किलो ड्रग्स तुषार सूर्यकांत काळे याने नायगाव वसई येथे राहणाऱ्या जुबी उकोडो नावाच्या नायजेरियन व्यक्तीला विकले होते.
छोटा राजन गॅंगशी संबंध
आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्स बनवले आहेत.
गुजरातकडे धाव
पिंपरी चिंचवड शहरात ड्रग्स पकडल्यानंतर आरोपींनी लपण्यासाठी गुजरातकडे धाव घेतली. तसेच त्याच ठिकाणी आपले बस्तान बसविण्याचा निर्णय घेतला. तिथे ते कंपनी सुरू करून ड्रग्स बनविणार होते.
स्वयंघोषित डॉक्टरची लाखोंची कमाई
अरविंद कुमार हा एमएससी ऑर्गेनिक केमिस्ट्री शिकलेला आहे. स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा अरविंद कुमार ड्रग बनविण्यात तरबेज आहे. अरविंदने अन्य आरोपींना एमडी ड्रग्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या दोन तासांच्या प्रशिक्षणासाठी त्याला 35 लाख रुपये देण्यात आले होते.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, पोलीस सब इन्स्पेक्टर गिरीष चामले व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदीप पाटील, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्ठे यांनी केली आहे.
बॉलीवुडच्या चर्चा
अभिनेत्री ममता कुलकर्णी ड्रग्ज केसमधील साक्षीदार राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी याला पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीं मनोज पालांडे हा देखील हिंदी चित्रपट सृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्याच्या जवळचा असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.