- आसनक्षमतेचे निर्बंध आणि भाड्याचा ताळमेळ बसणे अवघडच
पिंपरी – शहरात नाट्यगृहे सुरू झाली मात्र अद्याप नाटकांसाठी प्रतीक्षाच आहे. सध्या नाट्यगृहे ही केवळ राजकीय कार्यक्रमांनीच भरत आहेत. करोनामुळे आसनक्षमतेवर आलेले निर्बंध आणि नाट्यगृहांचे भाडे यामध्ये ताळमेळ बसविणे नाटक निर्मात्यांना अवघड जात आहे.
नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोगांचा श्रीगणेशा आता येत्या 13 तारखेला अभिनेते प्रशांत दामले यांच्या “एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाट्यप्रयोगाने होणार आहे. नाट्यगृहांमध्ये राजकीय कार्यक्रम मात्र झाले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 14 मार्चपासून शहरातील नाट्यगृहे बंद होती. 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर लगेचच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 14 ऑक्टोंबरला “दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन करण्यात आले होते. मात्र, “दिवाळी पहाट’ कार्यक्रम घेता येणार नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित कार्यक्रम ऑनलाइन झाला. त्यानंतर पुढील प्रत्येक रविवारी नाट्यप्रयोगासाठी “बुकींग’ झाले होते.
मात्र, सर्व बुकींग रद्द झाले. पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 22 नोव्हेंबरला, भाजपचा 25 नोव्हेंबरला नाट्यगृहात कार्यक्रम झाला. त्याशिवाय, पोलीस आयुक्तालयाकडूनही नोव्हेंबर महिन्यात कार्यक्रम घेण्यात आला. नाट्यप्रयोग मात्र एकही झालेला नाही. पिंपरी येथील आचार्य अत्रे प्रेक्षागृहात नोव्हेंबर महिन्यात बहुजन समाजाचा कार्यक्रम झाला. मात्र, नाट्यप्रयोग झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याची मागणी
राज्य सरकारने नाट्यगृहे 50 टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार विचार करता व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करायचे झाल्यास नाट्य निर्माते आणि कलाकार यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली नुकतेचे नाट्य व्यवस्थापक, कलाकार यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. तसेच, नाट्यगृहांच्या शुल्क 50 टक्के कमी करण्याची मागणी केली. पुणे पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी संबंधित शिष्टमंडळाला दिलेले आहे.
नाट्यगृहांचे भाडे अवाजवी
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सध्या 5 तासाला 9 हजार 558 रुपये इतके भाडे कार्यक्रमांसाठी आकारले जाते. तर, 3 तासांसाठी 4 हजार 838 रुपये भाडे घेतले जाते. 300 ते 400 रुपये तिकीट लावून होणाऱ्या नाट्यप्रयोगांसाठी 3 तासासाठी दुप्पट भाडे असते. सध्या 50 टक्के आसन क्षमतेनुसार नाट्यप्रयोग करायचा झाल्यास ते नाट्य निर्माते आणि कलाकारांना परवडणारे नाही. तिकिटातून मिळणारे बहुतेक उत्पन्न हे भाड्यासाठी जाण्याची किंवा भाड्यापेक्षाही कमी उत्पन्न होण्याची शक्यता अधिक आहे.