वॉशिंग्टन – नव्या आर्थिक धोरणाच्या टीमसह अमेरिकेचे नवीन प्रशासन पहिल्या दिवसांपासून देशाची स्थिती सुधारणेच्या कामाला लागेल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी केले आहे. विलमिंग्टन येथील एका कार्यक्रमात नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी त्यांच्या प्रशासनातील आर्थिक विभाग सांभाळणाऱ्या नवीन टीमची उपस्थितांना ओळख करून दिली.
त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात अत्यंत वेगाने काम करण्याची गरज असून त्यानुसार आम्ही व आमची आर्थिक टीम पहिल्या दिवसापासूनच कामाला लागणार आहोत. त्या म्हणाल्या की, कोविडचे आव्हान आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी अजून काही काळ कायम राहणार आहे.
अमेरिकेच्या सध्याच्या बिकट आर्थिक स्थितीचे वर्णन करताना त्यांनी नमूद केले की आज अमेरिकेतील सहा पुरुषांपैकी एक जण आपले कुटुंबीय उपासमारीचा सामना करीत असल्याची तक्रार करीत आहे. प्रत्येक तीन माणसांपैकी एक व्यक्ती आपली नियमित बिलेही भरण्यास असमर्थ आहे.
देशातील किमान 30 टक्के छोटे व्यवसाय बंद पडले आहेत. करोनावरची लस उपलब्ध होईपर्यंत आपले कुटुंब जिवंत कसे ठेवायचे ही अनेकांपुढील समस्या आहे, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेतील प्रत्येकालाच आज अर्थाजर्नसाठी नोकरी हवी आहे.
प्रत्येकाला त्याच्या घराची आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे याची सारी कल्पना अध्यक्ष बायडेन आणि आपल्याला आहे, असेही कमला हॅरिस यावेळी बोलताना म्हणाल्या.