वॉशिंग्टन – मूळ भारतीय वंशाच्या नीरा टंडेन यांची ज्यो बायडेन यांनी सरकारी व्यवस्थापन आणि अर्थसंकल्पीय विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीला अनेक रिपब्लिकन सिनेटरांना विरोध केला असला तरी आज खुद्द बायडेन यांनी त्यांच्या नियुक्तीचे समर्थन करताना त्यांच्या क्षमता व बुद्धीकौशल्याचाही दाखला दिला आहे.
50 वर्षीय नीरा यांच्या या नियुक्तीची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. अमेरिकन प्रशासनात हे एक महत्वाचे पद मानले जाते. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या धोरणानुसार प्रशासनाच्या कार्याची आखणी करण्याची जबबादारी नीरा यांच्यावर आली आहे.
विविध धोरणात्मक बाबींवर अध्यक्षांना सहाय्य करण्याबरोबरच अन्यही घटनात्मक जबाबदारी या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर असल्याने नीरा यांची या महत्वाच्या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अनेकाकडून कौतुकही झाले आहे.त्या आपल्या जबबादारीला आणि पदाला योग्य न्याय देतील, अशी खात्रीही बायडेन यांनी व्यक्त केली आहे.
नीरा या त्यांच्या मातोश्रींसमवेत भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाल्या आहेत. त्यांच्या मातोश्रींनी नीरा यांना त्यांच्या पित्याच्या अनुपस्थितीत वाढवले आहे. त्या सिंगल मॉम आहेत. त्यांनी अत्यंत कष्टाने नीरा यांचे पालनपोषण केले आहे. त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लक्षावधी अमेरिकन नागरिकांची नेमकी गरज लक्षात घेऊन त्या कार्य करतील, या अपेक्षेने बायडेन यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे.