राजगुरूनगर (पुणे) -तिन्हेवाडी (ता. खेड) येथे डेअरीला दूध पोहोचवून दुचाकीवरून घरी निघालेल्या वसंत उर्फ दत्तात्रय भगवंत आरुडे यांच्यावर बिबट्याने झेप घेतली. बिबट्या दुचाकीच्या मागील बाजूला धडकला. सुदैवाने दुचाकी चालक वसंत आरुडे यांना बिबट्याचा स्पर्श झाला नाही.
तिन्हेवाडी (ता. खेड) परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असून वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी तिन्हेवाडीचे सरपंच व राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, माजी सरपंच भगवंत गेनू आरुडे, माजी सदस्य नानाभाऊ आरुडे, रंगनाथ आरुडे व सहकाऱ्यांनी केली आहे. आरुडेवाडीच्या टेकडी वस्तीकडे जाणाऱ्या सातकरस्थळ -आरुडेवाडी पाणंद रस्त्यावरील ओढ्याच्या पुलावर गुरुवारी (दि. 26) साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. वसंत आरुडे हे दूध घालून घरी निघाले होते. रस्त्यावरील दिवे सुरू होते.
ओढ्याच्या पुलावर आल्यावर बाजूने अचानक डरकाळीचा आवाज आला. त्याबरोबर बिबट्याने आरुडे यांच्यावर झेप घेतली. ही झेप किंचित चुकली. आरुडे यांनी दुचाकी जोरात चालवून पुढे घर असलेल्या ठिकाणी जाऊन मागे पाहिले. तर बिबट्या त्याच ठिकाणी गुरगुरत फिरत असल्याचे निदर्शनास आले. वसंत आरुडे यांनी जवळच्या लोकांना बोलावून आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्या अंधारात गायब झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या वतीने या परिसरात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय गरज असल्यास पिंजरा लावण्यात येईल. तूर्त राजगुरूनगर शहरासह तिन्हेवाडी, कोहिणकरवाडी, सातकरस्थळ परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे यांनी केले आहे.
- बिबट्या पिंजऱ्यात येईना…
पंधरा दिवसांपूर्वी याच वस्तीत सचिन ज्ञानेश्वर आरुडे यांच्या कालवडीचा फडशा पाडला होता. त्यानंतर दोन दिवसांत लगतच्या सातकरस्थळ पश्चिम येथे बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. तर मागील आठवड्यात सातकरस्थळ पूर्वच्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या मागणी वरून सातकरस्थळ पश्चिम येथे अनेक दिवस पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र बिबट्या तिथे फिरकत नाही.