कोलकता -पश्चिम बंगालमध्ये गुरूवारी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्या स्फोटात 5 कामगार मृत्युमुखी पडले, तर तितकेच गंभीर जखमी झाले.
माल्दा जिल्ह्यातील सुजापूर भागात असणाऱ्या कारखान्यात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्याची तीव्रता मोठी असल्याने कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाचे बंब पाठवण्यात आले. कारखान्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे बचाव कार्याला गती देण्यासाठी वेगाने ढिगारा उपसण्याचे काम हाती घेण्यात आले.
स्फोटात जीवितहानी झाल्याने परिसरात तणाव पसरला. त्यातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठे पोलीस बळ तैनात करण्यात आले. कारखान्यातील अवजड यंत्रात तांत्रिक दोष निर्माण होऊन स्फोट झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी न्यायवैद्यक पथकाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांसाठी प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली. त्याशिवाय, जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपये मदत दिली जाणार आहे.