पुणे – गेल्या आठ महिन्यांपासून शहरभर थैमान घालणारी करोनाची साथ मागील महिनाभर नियंत्रणात येत होती. मात्र, दिवाळीसाठी नियमांना पायदळी तुडवून शहरभर झालेल्या गर्दीचे परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. करोनाचे नवीन बाधित संपूर्ण शहरात आढळून येत आहेत.
या आजाराचे रुग्ण शहरात सापडण्यास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीला ते काही ठराविक टप्प्यात सापडत होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेचा इशारा असताना, शहराच्या प्रत्येक भागात नवीन रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे, रुग्ण आढळलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करताना, प्रशासनाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
शहरात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन करोनाबाधीत रुग्णांचा आकडा घटण्यास सुरूवात झाली होती. हा आकडा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 130 पर्यंत खाली आला होता.
मात्र, एका बाजूला करोनाचे नवीन रुग्ण घटत असतानाच; दुसऱ्या बाजूला शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यांवर विक्रमी गर्दी झाली होती, त्यात अनेकांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर अशा अनेक नियमांना हरताळ फासला आहे.
त्यामुळे, नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा नवीन बाधित सापडण्यास सुरूवात झाली असून हा आकडा प्रतिदिन 400च्या वर पोहचला आहे. मात्र, यावेळी रुग्ण वाढताना, शहरात एका ठराविक भागात न वाढता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सापडण्यास सुरूवात झाली आहे, त्यामुळे संपूर्ण शहरच दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरण्याची भिती आहे.