वॉशिंग्टन – निवडणुकीत स्पष्ट पराभव होऊनही ट्रम्प प्रशासनाने हा पराभव मान्य केला नसून त्यांनी आता सत्ता न सोडण्याचीच भूमिका घेतलेली दिसून येत आहे. त्यासंबंधात जे संकेत मिळत आहेत ते अमेरिकेत 20 जानेवारीनंतर काही तरी विचित्र प्रसंग घडण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.
बायडेन यांनी मिळवलेला विजय अमान्य करीत ट्रम्प सरकारमधील परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ हे शुक्रवारी युरोप व मध्यपुर्वेतील काही देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अजूनही अमेरिकेवर आपलाच कब्जा असल्याच्या अविर्भावात ट्रम्प प्रशासन वावरत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे. ज्या देशांनी बायडेन यांच्या विजयाचे अभिनंदन केले आहे त्याच देशांच्या नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी पॉम्पेओ तिकडे चालले आहेत असे सांगितले जात आहे.
जगातल्या बहुतेक साऱ्या देशांनी अमेरिकतील निकालांना मान्यता देत ज्यो बायडेन यांचे अभिनंदन केले असले तरी ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लीकन पक्षाने हा निकाल मान्य केलेला नाही. त्यामुळे अमेरिकन रिवाजाप्रमाणे 20 जानेवारीला तेथे होणारे सत्तेचे हस्तांतर सुरळीत पार पडण्याच्या शक्यतेवरच आता सावट निर्माण झाले आहे.
ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये बसून धडाकेबाज पद्धतीने नवीन निर्णय घेतले असून त्यांनी अलिकडेच आपल्या मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्र्यांची हकालपट्टी करून तेथे नवीन संरक्षण मंत्री नियुक्त केला आहे. तशातच त्यांचे विदेश मंत्री अन्य देशांतील नेत्यांशी चर्चा करण्यसाठी एकाच वेळी अनेक देशांच्या दौऱ्यावर रवाना होत असल्याने हे सावट आणखीनच गडद होऊ लागले आहे.
मागच्याच आठवड्यात पॉम्पेओ यांनी पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक विधान करून साऱ्या जगालाच आश्चर्य चकित केले आहे. त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले की व्हाइट हाउसवर पुन्हा ट्रम्प यांचेच प्रशासन येणार असून हे नवीन परिवर्तन अत्यंत सहजपणे पार पडेल. एवढेच बोलून ते थांबले नव्हते तर त्यांनी आग्रहपुर्वक असेही नमूद केले होते की, 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेणार आहेत.
ही सारी लक्षणे डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या देशाविरोधात उठाव करण्याची तयारी करत आहेत असे दर्शवणारी असल्याचे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.