पुणे/हडपसर- पुणे महानगरपालिकेने केशवनगर-मुंढवा येथे कचरा टाकण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वीही शहरातील अनेक उपद्रवी आणि टाकाऊ प्रकल्प महापालिकेने येथे लादलेले आहेत. त्यातच भरीस भर म्हणून आता मोठ्या प्रमाणात कचराही येथे टाकला जात आहे. या निषेधार्थ सर्व उपद्रवी प्रकल्प आमच्याच माथी का? असा सवाल करीत केशवनगर ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम राबविली असून आयुक्तांना निवेदन दिले आहे.
केशवनगर भागात कचरा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. केशवनगर-मुंढवा परिसराची लोकसंख्या जवळपास 1.5 लाख आहे. पुणे शहराच्या सर्व भागातून कचरा केशवनगर भागात आणला जात आहे. पुण्यातून दररोज 20 ते 25 डंपर मोठे-मोठे डंपर भरून कचरा केशवनगर भागात येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुण्यातील म्हशीचे गोठे, कुत्र्यांची वसाहत, जॅक्वेल प्रोजेक्ट, कारकस प्रकल्प इत्यादी प्रकल्प केशवनगरमध्ये आले आहेत. पुण्यातील सर्व नको असलेले उपद्रवी प्रकल्प हे केशवनगरवर लादण्याचे काम पूर्वी पासूनच पुणे महानगरपालिकेने केले आहे.
पुणे मनपामध्ये 2017 मध्ये नव्याने 11 गावे समाविष्ट झाल्यानंतर केशवनगर भागामध्ये एखादा चांगला प्रकल्प येईल, उर्वरित शासकीय जागा केशवनगरच्या विकासकामांसाठी वापरली जाईल, अशी नागरिकांची आशा होती. परंतु, उपद्रवी प्रकल्प लादून केशवनगरवासीयांना वेठीस धरण्याचे काम महापालिकेने केले आहे, असा आरोप डॉ. दादा कोद्रे यांनी केला आहे. या विरोधात आता, नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.