नगर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भावजय व माजी सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती रात्री उशिराने जिल्ह्यात व्हायरल झाली. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह अन्य सर्वच क्षेत्रांत मोठी खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील यशवंत कॉलनी येथील विरंगुळा बंगल्यात गडाख कुटुंबीय वास्तव्यास आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गौरी गडाख यांनी घरातच गळफास घेतला. त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच गौरी यांना मृत घोषित केले. तसेच तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, गौरीच्या नातेवाईकांनी विरोध केल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन नगरऐवजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आज करण्यात आले. घाटी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आज आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौरी यांचा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क होता. समाजकार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. त्यामुळे त्या तालुक्यात विशेषत: महिला वर्गात लोकप्रिय होत्या. बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी मोठी चळवळ उभी केली होती.
गौरी प्रशांत गडाख यांचा शनिवारी सायंकाळी नगर येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची उत्तरीय तपासणी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात आली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, गळफास घेतल्यानेच गौरी गडाख यांचा मृत्य झाला असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक
गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार
सोनई, दि. 8 (प्रतिनिधी) -गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनई येथील अमरधाममध्ये आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुतणे उदयन गडाख यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डॉ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनील गडाख, आमदार संग्राम जगताप आदींसह गडाखांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. मोठा पोलीस ंदोस्तही तेथे तैनात करण्यात आला होता. अंत्यविधीसाठी लोणी परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.