जामखेड (प्रतिनिधी) – मागील 8 महिन्यांपासून करोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन होते. मागील तीन महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रम सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी लोककलावंतांनी वाद्यांच्या गजरात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
ग्रामीण विकास केंद्र, लोकाधिकार आंदोलन व वंचित हुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांनी केले. ते म्हणाले, करोना व लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच बंद असल्याने लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. या काळात सर्वच बंद असल्याने या कलावंतांना मजुरीवर देखील कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे या कलावंतांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्य सरकारने उद्योग, दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र बॅंड, मंडप, मंगल कार्यालय, बॅंजो पार्टी, आराधी, गोंधळी, संस्कृतीक कला केंद्र, सनईवाले, हलगीवाले, ढोली बाजा, घोडेवाले, भजनी मंडळ, नाटककार, खुला तमाशा, ढोलकी वादक, वाघ्या-मुरळी अशा लोककलाकारांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या कलावंतांची उपासमार थांविण्यासाठी हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी.
लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, द्वारका पवार, विशाल पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, मुकुंद घायतडक, काशिनाथ सदाफुले, बाबाराजे जाधव, भीमा काळे, सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, सागर भांगरे, राकेश साळवे, सुमित येरणे, बाबा पवार, अंकुश पुलावळे, असिफ पठाण, दीपक जोगदंड, सुखदेव वराट, संभाजी बारक, जिंतू पैठण पगारे, किरण जावळे, योगेश सदाफुले, पप्पूराज सदाफुले, संतोष चव्हाण (गोंधळी), कृष्णा गरड (गोंधळी), शिवा अंधारे, नितीन जाधव, सोनू जाधव, सनी जाधव, विशाल जाधव, दवणे मास्तर, स्वामी मास्तर, वैजीनाथ जाधव, विराज शेख आदींसह तालुक्यातील कलावंत या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी अजिनाथ शिंदे, भटक्या विमुक्तांचे सुरेश जाधव व विद्रोही संघटनेचे देवा देवकर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. संतोष चव्हाण यांनी आभार मानले.