माद्रीद – स्पेन मध्ये गेल्या 24 तासात करोनामुळे तब्बल 900 जणांनी आपला प्राण गमावला आहे. तथापी तेथील चांगली बातमी ही आहे की आता तेथे करोनाची बाधा होण्याचे प्रमाण घटू लागले आहे. स्पेन मध्ये आत्तापर्यंत करोनाने एकूण 10 हजार 935 लोकांचे बळी गेले आहेत, तर त्या देशातील एकूण 1 लाख 17 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे.
सरकारी आकड्यांनुसार तेथील करोनाची बाधा होण्याचे प्रमाण 7.9 टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांवर आले आहे. तर मृत्यूचेही प्रमाण 10.5 टक्क्यांवरून 9.3 टक्क्यांवर आले आहे. मार्च 25 ला मृत्यूचे हे प्रमाण 27 टक्के इतके होते. तथापी अजूनही तेथे करोनावर लाखाच्यावर रूग्णांवर उपचार सुरू असल्याने आणि त्यातील अनेक जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा येत्या काही दिवसांत खूप वाढू शकतो असे तेथील वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.