पाटण – एका महिलेने एक अल्पवयीन मुलीच्या मतिमंदपणाचा गैरफायदा घेत बाहेर फिरायला नेऊन खाऊ व पैसे देण्याचे आमिष दाखवून पाटण व परिसरातील लोकांची ओळख करून त्यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. संशयित आठ जणांनी गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण व परिसरातील नऊ जणांना अटक केली आहे.
याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने 27 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व गतिमंद मुलीला बाहेर फिरायला नेऊन खाऊ देण्याचे तसेच पैशाचे आमिष दाखवले. पाटण व परिसरातील लोकांशी ओळख करून दिली. त्यांच्याशी अल्पवयीन मुलीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. या सर्व संशयितांपैकी आठ जणांनी या मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे.
या घटनेची तक्रार मुलीच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पाटण पोलिसांनी संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन बारा तासात अटक केली. त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. सोमवारी संशयितांना कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.