अयोध्या (उत्तर प्रदेश) – अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाला 54 देशांतील 88 राजनैतिक प्रतिनिधींनी हजेरी लावली होती अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिली. मुख्यमंत्री योगी म्हणाले, “देश आणि जगाने अयोध्येचा दीपोत्सव पाहिला आहे. 54 देशांतील मुत्सद्दींनी येऊन नवीन अयोध्येला भेट दिली आहे.
भव्य ‘दीपोत्सव’ हा पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचा एक भाग होता. दिवाळी हा सण आपल्या सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याचे एक माध्यम आहे. यावेळी जे उपस्थित नव्हते त्यांनी सणासुदीच्या दिवशी पवित्र नगरीत येण्याची संधी गमावल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येथे जे विदेशी राजदूत उपस्थित राहु शकले नाहीत त्यांनी आम्हाला संदेश पाठवून ही चांगली संधी गमावल्याबद्दल खंत व्यक्त केली असे ते म्हणाले.
तत्पूर्वी आज, रविवारी सकाळी मुख्यमंत्री योगी यांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिली आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अयोध्येत भगवान हनुमानाची पूजा केली. त्यांनी अयोध्येतील रामलल्ला विराजमान स्थळाला भेट देऊन प्रार्थना केली.
अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या’दीपोत्सवात यंदा 22.23 लाख पणत्या प्रज्वलित करून एक नवीन गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला. मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला 15.76 लाख दिवे प्रज्वलित केले गेले होते. या दीपोत्सवात श्रीलंका, नेपाळ, रशिया अशा विविध देशांतील कलाकारांनी रामलीला सादर केली.