“केंद्राने दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स बंदच”

नवी दिल्ली – देशात दीड वर्षांपासून करोनाचे संकट ठाण मांडून बसले आहे. आता जरी काही प्रमाणात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांना केंद्र सरकराने पीएम केअर फंडामधून मदतनिधी वा करोना नियंत्रणासाठीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या. मात्र, केंद्र सरकारने पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सपैकी तब्बल 60 टक्के व्हेंटिलेटर्स खराब होते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

विनायक राऊत यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभेत याच मुद्‌द्‌यावर बोट ठेवत केंद्र सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, करोना काळात केंद्र सरकारकडून मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवण्यात आले. 

करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची गरज असल्यामुळे त्याचा पुरवठा पीएम केअर फंडामधून करण्यात आला. केंद्राने दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स खराब होते. आजही हे व्हेंटिलेटर्स बंद अवस्थेत आहेत. हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्यासाठी टेक्‍निशियन्स देखील मिळत नव्हते, असे त्यांनी लोकसभेत सांगितले.

करोना काळात केंद्र सरकारकडून विविध राज्यांना मिळणारा मदतनिधी आणि वस्तूंचा पुरवठा यावरून मोठं राजकारण पाहायला मिळाले. बिगर भाजपा सरकार असणाऱ्या राज्यांना निधी वा वस्तू पुरवण्यात केंद्राकडून भेदभाव केला जात असल्याची टीका देशातील अनेक कॉंग्रेसशासित राज्यांनी केली. महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील अशा प्रकारची तक्रार केल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, देशात करोनाची साथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संसदेत करोनाच्या हाताळणीविषयी चर्चा होत असल्याचं समोर आलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी देखील यासंदर्भात गेल्या अधिवेशनात मागणी करून ती मागणी मान्य झाली नव्हती. यावेळी करोनावर चर्चा होत असून त्यामध्ये विनायक राऊत यांनी व्हेंटिलेटर्सचा मुद्दा उपस्तित केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.