पुणे – जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांच्या सुश्रुषेसाठी नेमलेल्या “लाइफलाइन’ कंपनीकडील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता महापालिकेकडून तत्काळ 50 डॉक्टर्स आणि 150 वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
जम्बोमध्ये होत असलेले रुग्णांचे मृत्यू, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्तांसह पालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी जम्बोमध्ये तळ ठोकून आहेत. जम्बोमधील समस्यांचा सर्वंकष आढावा घेऊन उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून येत्या दोन दिवसांत येथील व्यवस्था सुरळीत होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता, या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्या सुश्रुषेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय यंत्रणांमधील समन्वयासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तालय, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जम्बोसंबंधी समन्वयाचा अभाव आहे. या यंत्रणांमध्ये समन्वय घडवण्यासाठी समन्वय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. समन्वयाअभावी निर्माण होत असलेल्या समस्या दूर करणे आणि चांगली वैद्यकीय सुविधा पुरवली जाण्यासाठी ही समिती काम करणार आहे. समन्वयाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.
जम्बो कोविड रुग्णालयातील एकंदरीत कामकाज, सुविधा आणि वैद्यकीय उपचार यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अतिरीक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी जम्बोच्या कारभारावर लक्ष ठेवणार असून, येथील त्रुटी दूर करुन सुरळीत काम सुरू राहील याची दक्षता घेणार आहेत.