दोन कोटी रुपयांची “चित्रपट नगरी’
मुंबई, ता. 27 – आरे दूध कॉलनीच्या परिसरात दोन कोटी रुपये खर्च करून पाचव्या योजना काळात (1974-79) “चित्रपट नगरी’ उभारणार आहे. पहिल्या वर्षी 25 लाख रुपये खर्च करण्यात येतील. फक्त मराठी चित्रपटांचीच निर्मिती करता येईल असा
स्टुडिओ पहिल्या दोन वर्षात चित्रपट नगरीत उभारण्यात येणार आहे. मूळ जागेची साफसफाई, रस्ते, पूल व पाणीपुरवठ्याचे नळ टाकण्यासाठी आतापर्यंत 30 लाख रुपये खर्च झाले आहे.
एकच समाजवादी पक्ष करण्याविषयी बोलणी
जयपूर – समाजवादी पक्ष व संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांची कोटा येथे काल प्राथमिक बोलणी होऊन दोन्ही पक्षांचे विलिनीकरण एका पक्षात करण्याविषयी चर्चा झाली. पुढील बोलणी लवकरच दिल्ली येथे सुरू होईल.
चित्रपटाच्या अखेरीस राष्ट्रगीत वाजविण्याचा नियम रद्द
नवी दिल्ली – चित्रपटाचा प्रत्येक खेळ संपल्यानंतर चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविण्यात यावे असा नियम फेब्रुवारी 1963 पासून करण्यात आला होता. तो यापुढे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
एक खासदार तरी जागृत आहे!
नवी दिल्ली – खासदार परिपूर्णानंद पाइनुली यांनी आपल्या मासिक पगारात स्वखुशीने 10 टक्के कपात करण्याचे ठरविले आहे. हे 1 सप्टेंबरपासून अंमलात येणार आहे. सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती नाहिशी होईपर्यंत ही कपात ते चालू ठेवणार आहे.
कुक्कुट पालन उद्योगाला शास्त्रीय रूप देणार
नवी दिल्ली – नॅशनल को-ऑपरेटिव्ह फेडरेशनने कुक्कुट पालन व्यवसायाला शास्त्रीय रूप देण्याचा निर्णय काल घेतला. ही योजना केंद्रीय कृषी मंत्रालय नियोजन मंडळ पोल्ट्री इंडस्ट्रीच्या सहकार्याने कार्यवाहीत आणण्यात येणार आहे.