राजकीय विरोधकांविरुद्ध “मिसा’चा वापर होणार नाही
नवी दिल्ली, दि. 5 – अंतर्गत सुरक्षा कायद्याचा “मिसा’ वापर चोरटा व्यापार व परकीय चलनाचा गैरवापर बंद पाडण्यासाठीच केला जाईल. राजकीय विरोधकांविरुद्ध हा कायदा वापरला जाणार नाही, असे आश्वासन आज लोकसभेत अर्थमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांनी दिले. चोरटा व्यापार करणाऱ्यांना अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्याबाबत व त्यांना कोर्टात दाद मागता येऊ नये म्हणून राष्ट्रपतींनी जे दोन वटहुकूम काढले होते,
त्यांना कायद्याचे स्वरूप देणाऱ्या विधेयकावर सहा तास झालेल्या चर्चेला सुब्रह्मण्यम उत्तर देत होते. अंतर्गत सुरक्षा कायद्यामुळे देशातील चोरट्या व्यापाराचा कणाच मोडला आहे, असे ते म्हणाले. विरोधकांनी आरोप केला की, राजकीय विरोधकांना पकडण्यासाठी हा कायदा वापरला जात आहे, तेव्हा असे झाल्याची उदाहरणे द्या, असे सुब्रह्मण्यम म्हणाले.
सीमांच्या रक्षणास सतत तयार राहा हवाई दल प्रमुखांचे आवाहन
पुणे – हवाई दलाच्या जवानांनी, तंत्रज्ञांनी आधुनिक तंत्र, कौशल्य या गोष्टी आत्मसात करून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सतत तयार राहिले पाहिजे, असे आवाहन भारतीय हवाई दलाचे प्रमुख ओ. पी. मेहरा यांनी आज येथे झालेल्या मानाभिषेक संचलनाच्या वेळी बोलताना केले. अशा स्वरूपाचे संचलन हे पुणे विभागात प्रथमच झाले.
लोहगाव विमानतळावर झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मेहरा पुढे म्हणाले, देश सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. अशा प्रसंगी प्रत्येकाने खर्च कमी करून जास्तीत जास्त काटकसर साधली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध शस्त्रास्त्र सामग्रीच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत, त्यामुळे अधिकाधिक काटकसर करणे अगत्याचे झाले आहे.