जिल्हा बॅंकेचे संचालक मोहिते यांची माहिती
राजगुरूनगर- पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील 7 हजार 442 शेतकऱ्यांना 48 कोटी 56 लाख 70 हजार रुपये 15 दिवसांत खरीप हंगामासाठी कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती बॅंकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील, बॅंकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.
खेड तालुक्यात पुणे जिल्हा बॅंकेच्या 18 शाखा आहेत. तालुक्यातील 100 पेक्षा जास्त सहकारी सोसायट्या आहेत. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले जाते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. त्यानंतर शासनाने दुसरेही धोरण जाहीर करीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दि. 31 मार्चपूर्वी नियमित कर्ज भरली आहेत. मार्चअखेर तब्बल 97.5 टक्के कर्ज वसुली झाली आहे. दरम्यान, करोना विषाणूचे संकट आल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. म्हणून जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना एप्रिलच्या सुरुवातीपासुन पीक कर्ज वाटपास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत खेड तालुक्यातील जिल्हा बॅंकेच्या 18 पैकी दहा शाखांमधून 7442 शेतकऱ्यांना 6323. हेक्टर क्षेत्रासाठी 48 कोटी 56 लाख 70 हजाराचे पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरित आठ शाखांच्या माध्यमातून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्हा बॅंकेच्या खेड विभागात येणाऱ्या कडूस, आळंदी, पाईट,दावडी, चास, भोसे, बहुळ, मरकळ, कुरकुंडी, आंबोली शिवे या शाखांमधून कर्ज वाटप केले आह.