भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार – बॅ. गाडगीळ
पुणे, दि. 06 – भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे भ्रष्टाचार निर्माण होत नसला तरी या अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार अपरिहार्य ठरतो, असे उद्गार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी वसंत व्याख्यानमालेत भ्रष्टाचार या विषयावर बोलताना काढले.
शेतीस दुग्ध जोडधंदा लाभदायी
पुणे – संकरित वासरांची पैदास वाढवून दुग्ध व्यवसायास चालना देणारी गरज असून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आर्थिक परिस्थिती सुधारण्यात सहाय्य झाले पाहिजे व गुरांची चांगली काळजी घेऊन त्यांचे आरोग्य चांगले राहण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन संभाजीराव पाटील यांनी 600 गुरांच्या पशुसंवर्धन व शस्त्रक्रिया शिबिरात बोलताना केले.
भारतास अमिरात क्रुड ऑइल पुरविणार
नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीने भारताला बऱ्याच मोठ्या प्रमाणात किफायतशीर ठरेल अशा दराने दीर्घमुदतीसाठी क्रुड ऑइल पुरविण्याचे मान्य केले आहे, असे अमिरातीचे विदेश मंत्री खलिफ अल सुवैदी यांनी जाहीर केले.
मुदतपूर्व निवडणुकीची गरज नाही
मद्रास – संघटना कॉंग्रेसचे नेते कामराज भाषण करताना म्हणाले की, मुदतपूर्व निवडणुका घेण्याची जरुरीच नाही. कारण सत्तारूढ पक्षाला आताच पार्लमेंटमध्ये दोनतृतीयांश बहुमत आहे.
ताग कामगारांचा संप चालूच
कलकत्ता – पश्चिम बंगालमधील 62 ताग गिरण्यातील सुमारे अडीच लाख कामगारांनी काल सुरू केलेला बेमुदत संप चालू आहे.