सिक्कीम भारताचे घटक राज्य बनवा
गंगटोक, दि. 10 – चोग्यालपद रद्द करून सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनवावे, असा ठराव सिक्कीम असेंब्लीने आज एकमतानं संमत केला. सिक्कीमी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यास भारताचा पूर्ण पाठिंबा राहील, असा संदेश इंदिराजींनी सिक्कीमचे मुख्यमंत्री दोरजी यांना पाठविला आहे. असेंब्लीच्या या निर्णयावर जनमत अजमाविण्यात येईल.
तेलाच्या किमती स्थिर राखणार
कुवेत – क्रुडतेलाच्या किमती स्थिर ठेवाव्यात व उत्पादनावर मर्यादा असावी, असे मत कुवेतचे तेलमंत्री अकेल मुतालिक कासिमी यांनी येथील “अल याकारा’ साप्ताहिकास मुलाखत देताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तेल उत्पादक राष्ट्रांनी आपले उत्पादन मर्यादित ठेवून दीर्घकाळासाठी ते राखून ठेवावेत.
“बॉंबे हाय’वरील चौथ्या विहिरीतून तेलाचा उपसा
मुंबई – बॉंबे हाय या सागरी तेल विहिरीवरील धक्क्यावरून पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रायोगिक तेल उपसा करण्याचे प्रात्यक्षिक केले. त्यांनी तेलाचा नळ उघडताच तेलाचा प्रवाह चौथ्या तेल विहिरीतून वर येऊन वाहू लागला.
पुण्यात 1100 बोगस लघुउद्योग
पुणे – पुण्यात सुमारे 1100 बोगस लघुउद्योग असल्याचे शासनाच्या उद्योग संचालनालयाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. एका पाहणीत असे आढळले की, बरेच लघुउद्योग अस्तित्वातच नाहीत. तर अनेक लघुउद्योग बंद झाले आहेत वा त्यांची दोनदा नोंदणी केली आहे. या सर्व बोगस लघुउद्योगांची यादी शासनाने राजपत्रकात प्रसिद्ध केली आहे
व त्यांची नोंदणी रद्द ठरविली आहे.