माओ-तेंग वादातून उजव्यांविरुद्ध मोहीम
हॉंगकॉंग, दि. 18 – चेअरमन माओ व माजी उपपंतप्रधान तेंग-सिंओ-पिंग यांच्यातील प्रत्यक्ष मतभेदातून उजव्यांविरुद्धची मोहीम सुरू झाली, असे पीपल्स डेलीच्या आजच्या अंकात म्हटले आहे. पीपल्स डेलीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेला अग्रलेख रेडिओ पेकिंगवरून ध्वनिक्षेपित करण्यात आला. या अग्रलेखात म्हटले आहे की, सिंगहुआ विद्यापीठातील काही लोकांनी गेल्या वर्षी चेअरमन माओ यांच्यावर खोटे आरोप असणारे पत्रक काढले होते. त्यामागे मि. तेंग हे होते, असे प्रथम चेअरमन माओ यांनीच निदर्शनास आणून दिले. सदर पत्रामधून पुरोगामी व प्रतिगामी असा झगडा दिसून येतो.
विजेचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न
नांदेड – विजेचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे, असे आज मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सांगितले. ते महाराष्ट्र वीज मंडळाच्या विद्युत भवनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राज्यातील कारखान्यांसाठी व खासगी वापरासाठी विजेची वाढती मागणी होत आहे. उजनी येथे 1000 मेगावॅट क्षमतेचे थर्मल स्टेशन उभारण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे.
78 सालापर्यंत दुसरा उपग्रह तयार होईल
बंगलोर – भारताचा दुसरा अंतराळ उपग्रह 1978 सालापर्यंत उड्डाणासाठी तयार असेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे चेअरमन प्रो. एस. धवन म्हणाले.