खासगी उद्योगक्षेत्राने आपली गुणवत्ता सिद्ध करावी
पुणे, दि. 17 – खासगी उद्योग क्षेत्रावर राष्ट्राने जो विश्वास टाकलेला आहे, तो योग्य असल्याचे त्या क्षेत्राने दाखवून द्यावे आणि आपल्या कामगिरीने गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन अर्थमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांनी केले. 1976-77 सालासाठी आपण जी प्रचंड योजना आखली आहे ती नुसार आणि त्याच वेळी चलनफुगवटा वाढीस साहाय्यभूत होणाऱ्या शक्तींना काबूत ठेवून आपल्याला वाटचाल करावयाची आहे. कोणतीही सवलत देताना एकूण अर्थव्यवस्थेला त्यापासून काय फायदा मिळणार आहे, हे पाहावे लागते.
बॉलपॉइंट पेनला सरकारी मान्यता
नवी दिल्ली – सर्वत्र वापरला जाणाऱ्या बॉलपॉइंट पेनला आता सरकारी मान्यता मिळाली आहे. एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारने असे जाहीर केले आहे की, सरकारकडे भरणा करावयाच्या चेक्सवर, त्याचप्रमाणे सरकारकडून रक्कम वसूल करण्यासाठी पाठविलेल्या बिलांवर बॉलपाइंट पेनने नोंद व सही केल्यास ते चालू शकेल. मात्र या नोंदी व सह्या स्वच्छ सुवाच्य असल्या पाहिजेत, असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. यापूर्वी मात्र बॉलपॉइंट पेनने लिहिलेले अधिकृत मानले जात नव्हते.