लाहोर – पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी शनिवारी निरनिराळ्या दहशतवादी संघटनांच्या 3 दहशतवाद्यांना अटक केली त्यांच्याकडून 400 किलो स्फोटके जप्त केली. ही कारवाई पंजाब प्रांतात केली गेली.
पंजाब प्रांताच्या वेगवेगळ्या भागांतून अटक केलेले हे तीन दहशतवादी बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि सिपाह-ए-सिहाबा पाकिस्तान या बंदी घालण्यात आलेल्या फुटीरवादी संघटनेचे सदस्य आहेत.
पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन आणि प्रामुख्याने पोलिसांना लक्ष्य केले जात असल्याचे ध्यानात घेऊन पंजाबमधील दहशतवादविरोधी विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण प्रांतात गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे व्यापक कारवाई केली.
गेल्या सात दिवसांत सीटीडीने पंजाब प्रांताच्या विविध जिल्ह्यात 46 ठिकणी कारवाई केली. त्यात 47 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे सीटीडीने सांगितले.
इब्राहिम दीन (बीआरए), शबर रझा (टीटीपी) आणि मिहमद कासिम (एसएसपी) अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दहशतवादी सरकारी कार्यालये, मुख्य ट्रान्समिशन लाइन आणि गॅस पाइपलाइनवर हल्ला करण्याचा कट करीत होते.
एसएसपीचा दहशतवादी कासिम हा संप्रदायिक वेबसाइट चालवत होता आणि शिया पंथाविरूद्ध सोशल मीडियावर द्वेषयुक्त सामग्रीचा प्रचार करण्यात गुंतला होता.