लिंक, ई-मेल पाठवून फसवणुकीचा फंडा
चार घटनांत तब्बल सव्वापाच लाख रु. लुटले
गुन्ह्यांची संख्या वाढली; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना विविध आमिष दाखवून तब्बल 5 लाख 23 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. या घटना मार्केटयार्ड, भैरोबानाला, कोंढवा परिसरात घडल्या. परदेशात नोकरी लावणे, बॅंकेचा पासवर्ड चोरणे, लिंक पाठवून आमिष दाखवत ही लूट करण्यात आली आहे.
माथाडी कामगाराचे पावणेदोन लाख रु. लंपास
बॅंकेतील बचत खात्याचा पासवर्ड चोरुन सायबर चोरट्याने माथाडी कामगाराच्या खात्यातून 1 लाख 79 हजार रुपये ऑनलाइन स्वतःच्या खात्यात वळवले. ही घटना मार्केटयार्ड परिसरात घडली. याप्रकरणी भरत जगताप यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप यांनी माथाडी कामातून मिळालेली रक्कम जमा केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ते काम सोडून गावी गेले. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांच्या बचत खात्याचा पासवर्ड आणि गोपनीय माहिती चोरुन पैसे हडपले.
बोगस लिंक पाठवून 80 हजारांचा गंडा
दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्याने 25 क्रिकेट बॅटची ऑर्डर स्वीकारुन फोन पेद्वारे रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून 80 हजारांचा गंडा घातला. ही घटना सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला परिसरात घडली. याप्रकरणी अनिल सचदेव यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचदेव यांचा क्रिकेट बॅटचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी एका भामट्याने त्यांना फोन करुन बॅटची ऑर्डर दिली. त्यानंतर ऑनलाइनरित्या पैसे पाठवण्याचे सांगितले. त्यासाठी सायबर चोरट्याने त्यांना फोन पे ऍपवर लिंक पाठवून कॉपी करण्यास सांगितले. त्यानुसार सचदेव यांनी लिंक कॉपी केली असता, त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने 80 हजार रुपये कमी झाले.
नोकरीच्या आमिषाने लुटले
परदेशात नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्याने तरुणाला 1 लाख 68 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी कुणाल राजपूत यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुणालने नोकरीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वारंवार संपर्क साधून गुुगल पे ऍपवर 1 लाख 68 हजार रुपये भरण्यास सांगितले. राजपूत यांनी टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली. मात्र, नोकरी न लागल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.
बनावट ई-मेल आयडीद्वारे लाख रुपये लुटले
सायबर चोरट्याने परदेशातील मित्राचा बनावट ई-मेल आयडी तयार करुन जेष्ठ नागरिकाला पाठवून एक लाखाची मदत मागितली. त्यानुसार जेष्ठ नागरिकाने ऑनलाइनरित्या रक्कम जमा केली. त्यानंतर त्यांनी परदेशातील मित्राला पैसे मिळाले का, अशी विचारणा केली. त्यावेळी मित्राने पैसे मागितले नसल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार नोंदिवली.