उंब्रज – तळबीड, ता. कराड येथील रेशन दुकानातून धान्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उघडकीस आणला. पुरवठा निरीक्षकांनी पंचनामा करून धान्य वाहतूक करणारे वाहन आणि गहू व तांदळाची 38 पोती ताब्यात घेतली आहेत.
याबाबत माहिती अशी, तळबीड येथील मुलाणी यांच्या रास्त भाव धान्य दुकानातून गहू व तांदळाची पोती महिंद्रा पिकअप गाडीतून नेऊन परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिली. या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली. याची दखल घेत तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षकांना तळबीड येथे तात्काळ पाठवले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर अडवून ठेवलेल्या महिंद्रा पिकअप मॅक्स (एमएच-50-8278) या वाहनाची तपासणी पुरवठा निरीक्षकांनी केली.
त्यावेळी या गाडीत तांदळाची 30 आणि गव्हाची आठ पोती सापडली. हा गहू व तांदूळ चांगल्या दर्जाचा असल्याचे आढळले. त्यानंतर निरीक्षकांनी दुकानाची ऑनलाइन व ऑफलाइन तपासणी करून, पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी हा धान्यसाठा तळबीड ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आला आहे. वाहनचालक दाऊद हुसेन मोकाशी (वय 28, मार्केट यार्ड, रत्नागिरी) याची चौकशी केली असता, हा धान्यसाठा कराड येथील बंडा पाटणे यांच्या गोडाऊनमध्ये नेण्यात येणार होता, अशी कबुली त्याने दिली. याबाबतची माहिती पुरवठा निरीक्षक एम. एस. अष्टेकर यांनी दिली.