महापालिकेचे कर संकलन : गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 कोटी 82 लाखांची वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या सात महिन्यांमध्ये मिळकत करातून आत्तापर्यंत 360 कोटी 64 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उल्लेखनीय बाब अशी की उद्योगनगरीत वाढत्या नागरीकरणाने आणि सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी भर पडत आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1 एप्रिल 2019 पासून 4 नोव्हेंबर 2019 पर्यंत ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.
नागरिकांनी ऑनलाइन भरण्यावर भर द्यावा, यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शहरातील 1 लाख 40 हजार 899 करदात्यांनी सर्वाधिक 164 कोटी 69 लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. महापालिका करसंकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून 4 नोव्हेंबरपर्यंत 2 लाख 62 हजार 1 इतक्या मिळकतधारकांनी 360 कोटी 64 लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला.
दरम्यान, करसंकलन विभागाकडे यंदा रोख व्यवहाराद्वारे 90 हजार 537 जणांनी 68 कोटी 95 लाख इतकी रक्कम जमा केली आहे. तर, 25 हजार 904 जणांनी धनादेशाद्वारे 99 कोटी 49 लाख रुपयांचा कर भरला आहे. डिमांड ड्राफ्टद्वारे 262 जणांनी 6 कोटी 99 लाख रुपयांचा कर भरणा केला. त्याशिवाय, “आरटीजीएस’, “एनईएफटी’ आदी कॅशलेस यंत्रणांचा देखील नागरिकांनी मोठा वापर केला असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीजीएसद्वारे 44 जणांनी 9 कोटी 21 लाख रुपयांचा कर भरला आहे. तर, एनईएफटीचा वापर करून 243 जणांनी 5 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम भरली आहे.
मिळकतधारक व उत्पन्न वाढले
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत 307 कोटी 82 लाख इतका मिळकतकर मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत 52 कोटी 82 लाख रुपये इतकी मिळकतकरात वाढ आहे. उत्पन्नासोबतच शहरातील मिळकतधारकांची संख्याही वाढली आहे. अवघ्या सात महिन्यात शहरात सुमारे अकरा हजाराहून अधिक मिळकतधारकांची वाढ झाली आहे. 31 मार्च 2019 अखेर 5 लाख 8 हजार 408 इतके मिळकतधारक होते. तुलनेत सध्या 5 लाख 19 हजार 490 इतके मिळकतधारक आहेत.