पिंपरी प्रतिनिधी) – नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी मांडता याव्यात यासाठी महापालिकेने “सारथी” हेल्पलाइन सुरू केली आहे. सारथी हेल्पलाइनवर शेकडो तक्रारी शहराच्या विविध भागातून येत असतात. मात्र, या तक्रारी अनेक वेळा न सोडविता बंद होत केल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सुटत नसल्यातरी सारथी हेल्पलाइनसाठी वर्षाला 31 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहराच्या नागरिकांना समस्या मांडता याव्यात आणि त्या तत्काळ सोडविता याव्यात या उद्देशाने 2013 मध्ये सारथी हेल्पलाइन सुरू केली. या सारथी हेल्पलाइनसाठी दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च केला जात असताना सारथीवरील तक्रारींकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. सारथी हेल्पलाइन कॉल ऑपरेटर नियुक्त करणे व सारथी हेल्पलाइन संगणक प्रणाली देखभाल दुरुस्ती एक वर्ष करण्यासाठी मे. टेक नाईन सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे.
मे. टेक नाईन सर्व्हिसेस यांना सारथी हेल्पलाइन कॉल ऑपरेटर नियुक्त करणे व सारथी हेल्पलाइन संगणक प्रणाली देखभाल दुरुस्तीसाठी 23 मार्च 2021 पासून एक वर्ष कालावधीकरिता देण्यात आले होते. याची मुदत दि. 22 मार्च 2022 रोजी संपली. त्यामुळे महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबविली होती.
मे. टेक नाईन सर्व्हिसेस या संस्थेने अंदाजपत्रकीय दरापेक्षा 8.76 टक्के कमी लघुत्तम दराने निविदा सादर केली होती. तसेच या संस्थेचे काम समाधानकारक आहे. त्यामुळे या संस्थेस अटी शर्तीस अधीन राहून एक वर्ष कालावधीसाठी कामकाज देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 31 लाख 25 हजार 461 रूपयांचा खर्चाला नुकतीच आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.