नवी दिल्ली -देशाच्या करोनाविरोधी लढ्यात योगदान देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही पुढे सरसावले आहेत. त्यातून त्यांनी विविध प्रकारचा खर्च कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत राष्ट्रपतींनी स्वत:च्या वेतनात वर्षभरासाठी 30 टक्के कपात केली आहे.
खर्च कमी करण्यासाठी राष्ट्रपती देशांतर्गत दौरे कमी करणार आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन हाही त्यामागील उद्देश आहे. जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रपती प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहेत. राष्ट्रपती भवनकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मेजवान्या आणि इतर समारंभांसाठीही काटकसरीची पाऊले उचलली जाणार आहेत. त्यासाठी पाहुण्यांची यादी छोटी ठेवली जाईल. खाद्यपदार्थांची रेलचेल कमी असेल.
त्याशिवाय, फुले आणि सुशोभीकरणाच्या साहित्याचा वापरही कमी केला जाईल. राष्ट्रपतींसाठी सुमारे 10 कोटी रूपयांची आलिशान लिमोझिन कार घेतली जाणार होती. ती खरेदी लांबणीवर टाकण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला आहे. राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रूपये वेतन मिळते. आता वेतन कपात आणि काटकसरीच्या राष्ट्रपतींच्या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात राष्ट्रपती भवनची सुमारे 20 टक्के बचत होईल. त्यामुळे साधारणपणे 40 ते 45 कोटी रूपये वाचणार आहेत.