गडचिरोली- महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. भामरागड तालुक्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात नक्षली दलमच्या महत्त्वाच्या कॅडरचाही समावेश आहे.पेरिमिली आणि अहेरी दलम हे मनेराजाराम ते पेरिमिली पोलीस मदत केंद्रादरम्यान कडमारा येथील जंगल परिसरात नक्षली तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी उप पोलीस मुख्यालय प्राणहिता अहेरी येथून दोन सी-60 पथक नक्षल ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले.
पोलिसांची ही शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सी-60च्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. या चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन नक्षलवादी पुरुषांचे मृतदेह सापडले आहेत.
पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी यांचा मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. वासू यांना पेरिमिली एलओएसच्या 2023मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत यांना उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी एलओएसचे कमांडर याची पडताळणी केली जात आहे.
बिटलू मडावी याने यावर्षी 9 मार्च रोजी पोलीस भरतीत गेलेल्या साईनाथ नरोटे याची पोलीस खबरी असल्याचे कारण देऊन हत्या केली होती. हत्येसह फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता. चकमक घडलेल्या घटनास्थळी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.