लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस रेल्वेगाडीनं शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धडक दिली. या भीषण अपघातात 29 यात्रेकरूंचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. यात 8 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरपासून 60 किमी अंतरावर ही घटना घडली.
पेशावर येथून शीख भाविक एका मिनी बसमधून नानकाना येथील गुरूद्वारात प्रार्थनेसाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर हे सर्व भाविक परत पेशावरकडे निघाले होते. परतीच्या प्रवासात असताना सच्चा सौदा फारूकाबाद शेखुपुरा येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर त्यांच्या मिनी बसला भरधाव एक्स्प्रेसने उडवले.
शाह हुसैन एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी कराचीहून लाहोरला जात होती. त्याचवेळी मिनी बस समोर आली. लाहोरपासून 60 किमी अंतरावर ही घटना घडली. यात मिनी बसमधील 29 भाविक जागीच ठार झाले. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.