-माधव विद्वांस
आपल्या अभिनयाने लोकनाट्य, नाटक आणि चित्रपटांमध्ये विनोदी अभिनयाचा वसंत फुलविणाऱ्या वसंत शिंदे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 14 मे, 1912 रोजी भंडारदरा येथे झाला. ते सात वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. घरची गरिबी. जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण. अशा परिस्थितीत ते 12 वर्षांचे असताना वर्ष 1924 मध्ये नाशिकला त्यांच्या आतेभावाकडे गेले. भावाच्या ओळखीने “हिंदुस्थान फिल्म कंपनी’मध्ये दरमहा पाच रुपये पगारावर त्यांना काम मिळाले.
कोहिनूर मिलचे मालक आपटे यांची ही कंपनी होती. तेथे दादासाहेब फाळके प्रमुख होते. शिंदे यांना चित्रकलेचे थोडे अंग आहे, हे लक्षात आल्यावर त्यांना पेंटिंग विभागात पाठविण्यात आले. स्टुडिओतील प्रत्येक कामगाराला अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असायचा.
सुदृढ शरीरयष्टी, मिश्कील स्वभाव यामुळे दादासाहेबांचे लक्ष त्यांच्याकडे गेले व त्यांनी वर्ष 1925 मध्ये “चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका दिली व वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला. हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या कालखंडामध्ये 19 मूकपटामध्ये त्यांनी काम केले.
नंतर नाशिक येथून शिंदे यांनी पुणे गाठले व तेथे नव्याने स्थापन झालेल्या दामुअण्णा जोशी यांच्या लहान मुलांसाठी नाटक करणाऱ्या बालमोहन नाटक कंपनीत दाखल झाले. त्यानंतर पुन्हा नाशिकला आले व 11 ऑगस्ट 1929 रोजी स्थापन झालेल्या “अरुणोदय नाटक’ मंडळीमध्ये दाखल झाले. या कंपनीत त्यांनी चार वर्षांच्या कालावधीत सुमारे 14 नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर ते “नवजीवन संगीत मंडळी’मध्ये आले. या मंडळीत त्यांच्या विनोदी भूमिकेला भरभरून दाद मिळाली.
नवजीवन संगीत मंडळी बंद पडल्यावर ते चरितार्थासाठी कोल्हापुरात आले. तेथे रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या “आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचे कामही केले. विवाह झाल्यानंतर प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढल्या. या दरम्यान वर्ष 1941 मध्ये त्यांनी राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला. ही कंपनी राम गणेश गडकरी यांच्या “भावबंधन’ या नाटकाचे प्रयोग करत असे. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. शिंदे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. “भावबंधन’मधील “कामण्णा’ याची भूमिका दिनकर ढेरे करीत असत. हीच भूमिका त्यांच्या पश्चात शिंदे यांच्या वाट्याला आली.
वर्ष 1946 मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित “सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत शिंदे यांनी लोकप्रियता मिळविली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर वर्ष 1939 ते 1996 या कालावधीत त्यांनी 190 मराठी व 7 हिंदी चित्रपटांत काम केले.
विनोदाबरोबर त्यांनी काही गंभीर भूमिकाही साकारल्या होत्या. “सांगत्ये ऐका’ या चित्रपटातील लीला गांधी यांच्याबरोबर वामनराव कर्डक रचित “सांगा ह्या वेडीला’ या झगडागीताला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या विनोदमूर्तीचे 4 जुलै 1999 रोजी निधन झाले.